सुरुवातीला अमित शहांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने अमित शहांना धारेवर धरलं, त्यांच्यावर टीका केली. तर या सगळ्या नंतर संध्याकाळी तातडीची पत्रकार परिषद घेत अमित शहा यांनी काँग्रेस संविधान विरोधी, आरक्षण विरोधी, ओबीसी विरोधी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी असल्याच सांगितलं. आणि हे सांगताना त्यांनी अनेक गोष्टींचा दाखला दिला. अमित शहा या पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले की पंडित नेहरूंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा द्वेष सर्व ज्ञात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेसने कशी सर्व शक्ती वापरली होती हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच खरच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी कट रचला होता का? अमित शहांना या वक्तव्यामधून काय म्हणायचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव झाला होता का? आणि जर झाला तर का झाला? हे सर्व जाणून घेऊयात
तस पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीत फारसा फरक नव्हता, परंतु प्रत्येक गोष्टीच्या अंमलबजावणीबद्दल आणि त्याबद्दलच्या कल्पनांबाबत दोघांचे विचार अतिशय वेगळे होते. विशेषतः जातीय आरक्षण, हिंदू कायद्याचे संहिताकरण, परराष्ट्र धोरण आणि काश्मीर या मुद्द्यांवरून त्यांचे विचार खूपच वेगळे होते.
भारत स्वतंत्र होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून सामील होण्यासाठी आमंत्रित केले. मंत्रिमंडळातील इतर बहुतेक सदस्यांप्रमाणे, आंबेडकर काँग्रेस पक्षाचा भाग नव्हते, यापूर्वी देखील त्यांचा काँग्रेस सोबत जास्त संबंध आला नव्हता. नेहरू आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इतर वरिष्ठ नेत्यांनी ज्या मूल्यांवर विश्वास ठेवला होता त्यातही ते फारसे सहभागी नव्हते. तर, कायदे मंत्री म्हणून आंबेडकर हे नेहरूंची निवड नव्हते. “इतर राजकीय विचारसरणीच्या उत्कृष्ट व्यक्तींनाही सरकारचे नेतृत्व करण्यास सांगितले पाहिजे.”असा महात्मा गांधींचा विचार होता म्हणूनच त्यांनी कायदेतज्ञ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कायदे मंत्री पदासाठी सुचवले होते.
वास्तविक पाहता भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधांबद्दल फारस कोणालाच माहिती नाही. तर , “नेहरू-आंबेडकर संबंध अस्पष्टतेत ढकलले गेले आहेत. त्याबद्दल कोणतेही पुस्तक नाही, किंवा माझ्या माहितीनुसार, एकही चांगला अभ्यासपूर्ण लेख नाही.” असं मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं होत. पण एका निवडणुकीदरम्यान जवाहरलाल नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील संबंध फारसे चांगले नसल्याचं स्प्ष्ट झालं होत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश नेहरुंच्या मंत्रिमंडळात जरी असला तरी सुद्धा त्यांना दुय्यम वागणूक दिली जात होती. त्याचं कारण होतं नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीमध्ये असलेला फरक. पंडित जवाहरलाल नेहरूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा फारशी पटायची नाही. तर संविधानातील कलम 370 वरून या दोघांमध्ये मोठे मतभेद होते आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळातील सदस्य असून देखील त्यांना दुय्यम वागणूक दिली जायची. आणि या सगळ्याला कंटाळून अखेर 27 सप्टेंबर 1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री मंडळातून मधून राजीनामा दिला आणि आगामी काळात येणारे निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची ठरवली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. कारण एकूणच त्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव पाहता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणूक जिंकले तर ते काँग्रेस विरोधात एक ताकदवान विरोधी पक्ष उभा करू शकतात अशी भीती त्यांना होती. म्हणूनच भविष्यातील हा संभाव्य धोका टाळण्यासाठी काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत एन केन करून हरवण्याचे निश्चित केले होते, असं सांगितलं जातं.
काळ होता १९५२ चा भारतात निवडणुका होऊ घातल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे नॉर्थ सेंट्रल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर त्यांना पराभूत करण्यासाठी नेहरूंच्या काँग्रेस पक्षाने आणि कम्युनिस्ट पक्षाने हातमिळवणी केली होती असं म्हंटल जात. कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी याकाळात अनेक पत्रके वाटली ज्यात डॉ. आंबेडकरांना उघडपणे देशद्रोही म्हटले होते. विविध ठिकाणी हि पत्रके वाटण्यात आली होती. आणि दरम्यान निवडणूका पार पडल्या. ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला तर काँग्रेस चे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर विजयी झाले होते. १९५२ च्या या निकालाबाबत बोलायचे झाले तर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरीचे आरोप झाले होते. डॉ. आंबेडकरांचा निवडणूकीत सुमारे १४५३७ मतांनी पराभव झाला आणि सर्वात आश्चर्यकारक म्हणजे या निवडणुकीत या जागेवरील ७४३३३ मते रद्द करण्यात आली होती.
१९५२ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या या निवडणूक पराभवाचे तपशीलवार वर्णन पद्मभूषण पुरस्कार सन्मानित लेखक धनंजय कीर यांनी केले आहे. धनंजय कीर यांनी त्यांच्या डॉ. बाबा साहेब आंबेडकर जीवन चरित्र या पुस्तकात या सर्व घटनांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. हे पुस्तक डॉ. आंबेडकरांवर लिहिलेल्या सर्वात प्रामाणिक पुस्तकांपैकी एक मानले जात असून डॉ. आंबेडकरांनी स्वतः या पुस्तकाला मान्यता दिली होती. या पुस्तकात धनंजय कीर यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांनी डॉ. आंबेडकरांविरुद्ध कसे कट रचला याचा उल्लेख केला आहे.
५ जानेवारी १९५२ रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, “मुंबईतील जनतेचा प्रचंड पाठिंबा इतका एकाकी कसा काय नाकारला गेला , हा निवडणूक आयुक्तांच्या चौकशीचा विषय आहे.” पुढे धनंजय कीर यांनी असेही लिहिले आहे की, निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या विधानात म्हटले होते की, “मुंबईतील लोकांनी मला इतका मोठा पाठिंबा दिला होता पण तो कसा वाया गेला? निवडणूक आयुक्तांनी याची चौकशी करावी” तर केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नव्हे तर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी देखील त्यांच्या विधानात म्हटले होते की, “डॉ. आंबेडकरांप्रमाणेच मलाही या निवडणूक निकालाबद्दल शंका आहे.” तर कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृता डांगे यांच्या कटामुळे ते हरले, असा विश्वास डॉ. आंबेडकरांचा होता असे धनंजय कीर यांनी लिहिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्याविरुद्धच्या कटांवर मौन राहिले नाही. त्यांनी या निवडणूक फसवणुकीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील निवडणूक घोटाळ्याचे पहिलेच बळी होते. तर डॉ. आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी निवडणूक घोटाळ्यावर न्यायालयात खटला दाखल केला होता. तर या पराभवानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य बनले, तर १९५४ च्या भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले, आणि त्यांना हि निवडणूक जिंकता आली नाही. तर १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकी पर्यंत त्यांचे निधन झाले होते.
तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? यावर तुमचे मत काय? ते कमेंट करून नक्की सांगा