राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते आणि मंत्री Dhananjay Munde यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. अखेर 82 दिवसांच्या चर्चेनंतर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पीएने हा राजीनामा ‘सागर’ बंगल्यावर नेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती.
काल ‘देवगिरी’ बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली, जिथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहिले आणि त्यांनी मुंडेंना राजीनामा देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर रात्रीच धनंजय मुंडे यांनी आपल्या पीएच्या माध्यमातून ‘सागर’ बंगल्यावर राजीनामा सुपूर्द केला.
हा राजीनामा राजकारणाला कोणता नवा कलाटणी देणार?
धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात नवा पेच निर्माण झाला आहे. पुढे कोणता नेता मंत्रिपदी येणार? धनंजय मुंडे यांना पक्षामध्ये नवीन जबाबदारी मिळणार का? या सगळ्या घडामोडीवर राजकीय जाणकारांचे लक्ष आहे.