आजच्या बातम्या

महाराष्ट्र राज्य बोर्डाने घेतला मोठा निर्णय, दहावी-बारावी परीक्षा आणि कॉपीप्रकरणी कठोर उपाय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक आणि निर्भय पार पडाव्यात यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने जाहीर केले की, परीक्षेतील कोणत्याही प्रकारची कॉपी किंवा गैरमार्ग आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द केली जाईल.

तसंच, परीक्षेतील शिस्त आणि पारदर्शकतेसाठी परीक्षा केंद्रावरील शिक्षक, केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांची अदलाबदल करण्याच्या निर्णयात काही बदल करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांतील परीक्षांमध्ये ज्या केंद्रांवर गैरमार्ग वापरण्याच्या घटना आढळल्या, अशा केंद्रांवर आता संबंधित परीक्षा केंद्रांचे अधिकारी बदलले जातील.

बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहेत. मात्र, २०२१ आणि २०२२ या कोरोना काळातील परीक्षांनंतर, २०१८, २०१९, २०२०, २०२३ आणि २०२४ या वर्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाच्या प्रकरणांमुळे शंकेची निर्मिती झाली, त्यावर केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीवर बदल करण्यात येणार आहे.

हे बदल म्हणजे, जे परीक्षा केंद्र कॉपीप्रकरणांपासून मुक्त आहेत, त्या केंद्रांवर त्याच ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक, केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांचीच नियुक्ती होईल. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी हे आदेश जारी केले आहेत.

तसंच, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना परीक्षा पारदर्शकपणे पार पडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपायांची योजना आखण्याची मुभा दिली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती आणि विभागीय मंडळे जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत ठेवण्याची खबरदारी घेतील, जेणेकरून परीक्षा निर्विघ्न आणि निष्पक्षपणे पार पडू शकेल.

ही सर्व उपाययोजना बोर्डाने परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *