देवी योगेश्वरी: कोकण व मराठवाड्याचा अद्वितीय सांस्कृतिक दुवा
बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर वसलेली आंबाजोगाई नगरी मार्गशीर्ष महिन्यात भक्तांच्या गजबजाटाने फुलून जाते. याचं कारण म्हणजे देवी योगेश्वरी, जी कोकणातील अनेक कुटुंबांची कुलदैवत मानली जाते. बीडच्या भूमीत वसलेल्या या देवीचा कोकणाशी नेमका काय संबंध आहे? देवी योगेश्वरी कोकणातील कुटुंबांची कुलदेवता कशी बनली? चला, जाणून घेऊया.
देवी योगेश्वरीची पौराणिक कथा
योगेश्वरी देवीला साक्षात आदिमाया आदिशक्तीचे रूप मानले जाते. तिच्या अवतारामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. दांतसूर नावाच्या असुराचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले. दांतसूराचा पराभव केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली. यामुळे या स्थळाला आंबाजोगाई असे नाव मिळाले. दांतसूरावर विजय मिळवल्यामुळे तिला दांतसूरमर्दिनी असेही संबोधले जाते.
देवीच्या कुमारिका स्वरूपाची कथा
योगेश्वरी देवी कुमारिका असल्याचे सांगितले जाते. परळीच्या वैजनाथांशी तिचा विवाह ठरला होता, पण लग्नाचा मुहूर्त चुकल्याने विवाह होऊ शकला नाही. यामुळे योगेश्वरी देवीने आंबाजोगाईतच वास्तव्य केले.
कोकणातील कुलदैवता कशी झाली?
भगवान परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यानंतर काही कुटुंबे कोकणात नेली. या कुटुंबांच्या विवाहासाठी त्यांनी अंबाजोगाईच्या मुली निवडल्या. योगेश्वरी देवीने या विवाहासाठी एक अट ठेवली—“या मुलींच्या कुलाची मी कुलदेवता असेन.” त्यामुळे कोकणातील अनेक कुटुंबांची देवी योगेश्वरी कुलदैवता बनली.
आजही श्रद्धेचा केंद्रबिंदू
देवी योगेश्वरी ही केवळ धार्मिक नाही तर कोकण व मराठवाड्याला सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारी महत्त्वाची कडी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, गोवा यांसारख्या ठिकाणांहून असंख्य भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात.
तुम्ही कधी देवी योगेश्वरीचे दर्शन घेतले आहे का?
तुमचे अनुभव आणि विचार आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा!