मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी लागली की ‘झुकुझुकू आगीनगाडी’त बसून पळती झाडे पाहत मामाच्या गावाला जाण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागते. मात्र यंदा शालेय शिक्षण विभागाने ५ मार्च ते ३० जून या कालावधीत दुसरी ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या निपुण भारत योजनेंतर्गत विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सुट्टीच्या काळाचा उपयोग’ करत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या या निर्णयामुळे शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालकांवरही अतिरिक्त जबाबदारी पडणार आहे.
असर आणि नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण यांसारख्या अभ्यासांमध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या सध्याच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. इयत्ता दुसरीच्या पातळीचे भाषिक ज्ञान आणि गणिती क्रिया पाचव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना येत नसल्याने शालेय शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांसाठी सुधारित कार्यक्रम आखला आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी अपेक्षित कौशल्ये आत्मसात केली की नाही, याची तपासणी करावी लागणार आहे. तसेच ज्या विषयांत विद्यार्थ्यांना कमी गती आहे, त्या विषयांसाठी विशेष उपाययोजना शालेय वेळेत करायच्या आहेत. याशिवाय सुट्टीच्या कालावधीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष संपर्क ठेवण्याचीही अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, याची जबाबदारीही शिक्षकांवरच टाकण्यात आली आहे.
शिक्षकांच्या सुट्ट्यांवर सरकारचा भर? शासनाच्या नियमानुसार शिक्षकांना उन्हाळी सुटी मिळते, मात्र सरकारकडून शिक्षकांच्या सुट्ट्यांवर वारंवार निर्बंध आणले जात असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. याआधी शिक्षकांना १ मे ऐवजी १५ मेपर्यंत विविध शैक्षणिक कामांसाठी व्यस्त ठेवण्यात आले होते. आता तर संपूर्ण उन्हाळी सुट्टीच शिक्षकांसाठी कार्यरत राहण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप राज्य मुख्याध्यापक संघटनेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी केला. तसेच, सुट्टीच्या काळात काम करणाऱ्या शिक्षकांना कोणतीही भरपाई रजा दिली जाणार नाही, हे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
उपक्रम महत्त्वाचा, पण वेळ चुकीची? प्राथमिक शिक्षण सुधारण्यासाठी अशा उपक्रमांची गरज नक्कीच आहे, पण विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करणे गरजेचे आहे. पूर्वी उन्हाळी सुट्टी दोन महिने असायची, मात्र त्यात कपात झाली आहे. सुट्टीत पुन्हा अभ्यासाचा ताण दिल्यास मुलांचा अभ्यासावरील उत्साह कमी होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी शालेय वेळेनंतर एक तास कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेतले, तर त्याचा चांगला परिणाम दिसू शकतो, असे मानसशास्त्रज्ञ मनाली रणदिवे-सबाने यांनी सांगितले.
शिक्षणाच्या पातळीमध्ये सुधारणा आवश्यक असली तरीही त्यासाठी उन्हाळी सुट्टीत हस्तक्षेप करणे कितपत योग्य आहे, यावर पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांमध्ये चर्चेचा मुद्दा बनला आहे.